पुणे व मिरज स्थानकातील चोरीचे गुन्हे उघड : पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रेल्वे स्टेशनवर उतरण्याच्या वेळी मदत करण्याचा बहाणा करून महिला प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या चोरट्याने पुणे व मिरज रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज लांबवल्याचे दोन गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून एकूण ११० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश उर्फ मोटा पिता फूलचंद (रा. न्यू अनाज मंडी, नजफगड, दिल्ली) असे आहे. या प्रकरणी पीडित महिलेकडून पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
तक्रारदार महिला वेरावळ–पुणे रेल्वेतून २५ मे रोजी प्रवास करत होत्या. त्यांच्या जवळ तीन ट्रॉली बॅगा व इतर सामान होते. पुणे स्थानकाजवळ गाडी येताच त्या सामान दरवाज्याजवळ आणण्याचा प्रयत्न करीत असताना चार अनोळखी व्यक्तींनी मदतीच्या बहाण्याने बॅगा उचलून देण्यास सुरुवात केली.
त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून ५२ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या व १ ग्रॅम वजनाची अंगठी चोरी केली. चोरी उघड झाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला असता रमेश आणि त्याच्या चार साथीदारांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
रमेश दिल्लीतील रहिवासी असून तो सराईत रेल्वे चोरटा असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले व दिल्ली पोलिसांच्या मदतीने रमेशला अटक केली. चौकशीत त्याने मिरज स्थानकातही अशाच प्रकारे मदत करण्याचा बहाणा करून ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ११० ग्रॅम दागिने जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अतिरिक्त अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इरफान शेख, सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील माने, सहायक फौजदार दीपक धिवार, सुरेश रासकर, पोलीस हवालदार दीपक ठोंबरे, संदीप काटे, प्रशांत डोईफोडे, उदय चिले, अमित गवारी, मिथून जानकर व रितेश राठोड यांच्या पथकाने केली.
