वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये धाडसी घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये सिक्युरिटी गार्डला कटरचा धाक दाखवून, त्याचे दोन्ही हात नायलॉनच्या पट्टीने बांधून, तब्बल ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे पावणे तीन वाजता घडली.
या प्रकरणी शोरुमचे जनरल मॅनेजर इंद्रसेन विलासराव जाचक (वय ४५, रा. बावधन) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींचे आतेभाऊ यशवंत मोरे यांचा वाकडेवाडीत ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड बुलेट शोरुम आहे. तेथे राजू खान (वय ३६) हे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात व शोरुममध्येच राहतात.
घटनेच्या दिवशी पहाटे, राजू खान ड्युटीवर असताना एक अज्ञात व्यक्ती गेटमधून आत शिरला. त्याने कटरचा धाक दाखवून गार्डचे हात नायलॉन पट्टीने बांधले व धमकी देत म्हणाला : “तुम अगर जोर से चिलाया, तो मेरे आदमी बाहर खड़े हैं… मेरे इशारे पर तेरा मर्डर कर देंगे.”
यानंतर त्या व्यक्तीने गार्डला जबरदस्तीने सोबत घेऊन शोरुम उघडायला लावले. मॅनेजरच्या केबिनमधील कॅश काऊंटर रुमची चावी घेऊन त्याने टेबलचे ड्रॉवर उघडले व कपाटातील कापडी पिशवीत ठेवलेली ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड काढून घेतली.
रोकड घेतल्यानंतर आरोपीने गार्डच्या गळ्यावर कटर लावून पुन्हा धमकावले : “तुम इधर खड़े रहो… अगर चिलाया तो मैं कल आकर तेरा गला काट दूंगा.” यावेळी गार्ड राजू खान यांच्या अंगठ्यास कटर लागून जखम झाली. त्यांनी कशीबशी हात सुटवून घेतला व बाहेर पळत येऊन आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारच्या शोरुममधील सिक्युरिटी गार्ड धावून आले.
सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले करीत आहेत.
