शेअर मार्केटमध्ये १५ दिवसांत २ लाखांचा नफा देऊन गुंतवणूक करण्यास पाडले भाग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कमी वेळेत अधिक नफा कसा मिळेल, हे सांगून ५ लाखांच्या गुंतवणुकीवर १५ दिवसांतच २ लाख रुपये नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर सेवानिवृत्त लेखाधिकार्यास दीड महिन्यात दीड कोटी रुपयांची गुंतवणूक करायला भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.
याबाबत वडगाव शेरी येथील ६५ वर्षीय सेवानिवृत्त विभागीय लेखाधिकारी यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ मार्च ते २९ मे २०२५ दरम्यान ऑनलाईन घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विभागीय लेखाधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.
ते घरी असताना ‘कंगना शर्मा’ असे नाव असलेल्या व्हॉट्सअॅप युजरने त्यांना ‘नुवामा वेल्थ ग्रुप’मध्ये अॅड केले. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळेत अधिक नफा कसा मिळेल, याबाबतचे मार्गदर्शन केले जात असे.
इतर सभासदांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना झालेल्या नफ्याचे स्क्रीनशॉट पाठवले जात होते. सुरुवातीला त्यांनी काहीही प्रतिसाद न देता फक्त निरीक्षण करत होते. २३ मार्च रोजी दुपारी त्यांना मेसेज आला. कंगना शर्मा हिने शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमी वेळेत केलेल्या गुंतवणुकीवर १० ते २० टक्क्यांपर्यंत नफा मिळेल, असे सांगितले.
परंतु, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. २२ एप्रिल रोजी कंगना शर्मा हिने त्यांना ब्लॉक ट्रेडिंगचे अॅडव्हान्स ब्रोकर अकाऊंट तयार करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांचे अकाऊंट तयार करण्यात आले. त्यांना सेबीचे ऑथोरिटी प्रमाणपत्र व्हॉट्सअॅपद्वारे पाठवले.
त्यांचा विश्वास बसल्याने त्यांनी सुरुवातीला ५ लाख रुपये गुंतवले. त्याचा नफा ४४ हजार ५७३ रुपये त्यांच्या ट्रेडिंग खात्यावर जमा झाल्याचे दिसले. यानंतर ते वेळोवेळी गुंतवणूक करत गेले. त्याच वेळी त्यांना विड्रॉल प्रोसेसबाबत माहिती देऊन २ लाख रुपये १४ मे रोजी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले.
त्यामुळे त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. तसेच प्रत्येक वेळी कस्टमर सर्व्हिसमार्फत देण्यात येणाऱ्या बँक डिटेल्ससोबत ते सेबी रजिस्टर्ड प्रमाणपत्रही पाठवत होते. त्यामुळे त्यांनी २३ एप्रिल ते २९ मे २०२५ दरम्यान तब्बल १ कोटी ५७ लाख २७ हजार ८४८ रुपयांची गुंतवणूक केली.
२८ मे रोजी त्यांच्या ब्लॉक ट्रेडिंग अॅडव्हान्स ट्रेडिंगच्या खात्यावर २ कोटी ९३ लाख ४३ हजार ८५४ रुपये एवढी रक्कम दिसत होती. त्यांनी विड्रॉल रिक्वेस्ट पाठवली असता त्यांच्या ट्रेडिंग खात्यामधून सगळी रक्कम विड्रॉल झाल्याचे दिसले.
परंतु प्रत्यक्ष रक्कम त्यांच्या बँक खात्यावर आली नाही. त्यांनी कंगना शर्मा हिला विचारले. तिने ज्युडिशियल ऑथोरिटी व गव्हर्नमेंटला तुम्ही केलेले ट्रेडिंग संशयास्पद वाटल्याचे सांगून नंतर संपर्क साधते, असे सांगितले.
त्यानंतर त्यांना वेगवेगळी कारणे सांगून आणखी रक्कम भरण्यास सांगत होते. तेव्हा त्यांनी आपल्या सीए मित्राशी चर्चा केली असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहेत.
