राजगड पोलिसांनी तिघांना अटक : तीन अल्पवयीन ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन मुलीवर असलेल्या प्रेमाला तिच्या मानलेल्या भावाने विरोध करून तिच्या घरी माहिती दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलाने या भावाला डोंगरावर नेऊन साथीदारांच्या मदतीने खून केला. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर हा प्रकार घडला. राजगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीमंत अनिल गुज्जे (वय २१, रा. खंडोबा मंदिराजवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८, रा. गोकुळनगर, कात्रज, मूळ रा. खुठे गाव, ता. आवसा, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडे डोंगरावर एकाचा मृतदेह पडला असल्याचे तेथे फिरायला गेलेल्या लोकांनी पोलिसांना कळवले. राजगड पोलीस तेथे पोहोचले. तो मृतदेह सौरभ आठवले याचा असल्याचे लक्षात आले.
त्याच्या नातेवाईकांनी सौरभ आठवले बेपत्ता असल्याची तक्रार १८ ऑगस्ट रोजी भारती विद्यापीठ पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी त्याचे मित्र, नातेवाईक तसेच तो राहात असलेल्या ठिकाणी तपास केला.
मात्र, त्याला कोणी मारले याचा तपास लागत नव्हता. तपास पथकातील पोलीस अंमलदार नलावडे यांनी तांत्रिक साधने, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीच्या आधारे माहिती मिळवली की, हा खून एका अल्पवयीन मुलाने केला असून त्याला इतरांनी साथ दिली.
ते गोगलवाडी येथील चतुर्मुख मंदिरात जाणार होते. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चतुर्मुख मंदिर येथे सापळा लावला आणि संशयितांना ताब्यात घेतले. मांगडेवाडी येथे एक अल्पवयीन मुलगा आत्याकडे राहत होता.
त्याच बिल्डिंगमधील एका अल्पवयीन मुलीबरोबर त्याचे प्रेमप्रकरण होते. सौरभ आठवले हा तेथेच राहत असून तो या मुलीला रोज शाळेत सोडण्याचे व आणण्याचे काम करत होता. तिला तो बहिण मानायचा.
त्याने त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या आईवडिलांना सांगितली. परिणामी या मुलाला आत्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे रहायला जावे लागले. त्यामुळे त्यांच्या प्रेमात दुरावा निर्माण झाला. याचा या अल्पवयीन मुलाला राग होता. त्याने वडगाव मावळ आणि मांगडेवाडी येथील साथीदारांना घेऊन कट रचला.
या अल्पवयीन मुलाने सौरभ आठवले याला “तुज्यासोबत बोलायचे आहे” असे सांगून कात्रज बोगद्यावरील डोंगरात नेले. तेथे सर्वांनी मिळून कोयत्याने व इतर हत्यारांनी डोक्यात आणि शरीरावर वार करून निर्घृण खून केला.
खूनाचे नेमके कारण समोर आल्यावर पोलिसांनी तिघांना अटक केली. इतर तिघांचा नातेवाईकांसमक्ष तपास सुरू आहे. त्यांच्याकडून ३ मोबाईल, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या तिघांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील तपास करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, वृषाली देसाई, पोलीस अंमलदार सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुल कोल्हे, अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अजित मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भंडाळे, मंगेश कुंभार यांनी केली आहे.

















