खराडीतील रिलायन्स मार्टसमोरील पहाटेची घटना, तरुणाची प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अंडा भुजीच्या गाडीवर कामगार आणि ग्राहकांमध्ये झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणाच्या डोक्यात आणि तोंडावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
रोहन माने (वय २२, रा. मुंढवा झेड कॉर्नर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र रोहित तानाजी चौगुले (वय २६, रा. सणसवाडी चौक, सणसवाडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खराडीतील रिलायन्स चौक येथील रिलायन्स मार्टसमोर सोमवारी पहाटे पाऊण ते एक वाजेदरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एक मित्र अभि वाळके यांची रिलायन्स चौक खराडी येथे अंडाभुर्जीची गाडी आहे. सोमवारी पहाटे आरोपी तेथे आले होते. त्यावेळी कामगाराने गाडी बंद झाल्याचे सांगितले.
तेव्हा त्यांनी तुम्ही लवकर बंद करता, आम्हाला भुर्जी देत नाही, असे म्हणून त्यांनी कामगारांबरोबर वाद घातला. या वादाची माहिती मिळाल्यावर फिर्यादी रोहन माने व अभि वाळके हे तिघे वाद मिटविण्यासाठी अंडाभुर्जीच्या गाडीवर आले होते.
तिघे जण बोलत असताना दोघे आरोपी दुचाकी गाडीवरुन आले. त्यापैकी एकाने कोयत्याने कारची काच फोडली. त्यानंतर रोहन यांच्या डोक्यात आणि तोंडावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. रक्ताच्या थोराळ्यात रोहन पडल्यानंतर हातातील कोयता हवेत फिरवून आरोपींनी दहशत निर्माण केली व ते निघून गेले.
रोहन याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपींची ओळख पटली असून खराडी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ याबाबत खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले की, रोहन माने याची प्रकृती स्थिर आहे़ त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे.
