महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : प.पू. प्रवीणऋषीजी म.सा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्वामध्ये अष्टमंगल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विजेत्यांना महाराज साहेबांच्या उपस्थितीत आज सन्मानित करण्यात आले. युगल धर्म संघाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्वोत्तम सजावट करणाऱ्यांमधून पहिले तीन क्रमांक काढले असून त्यांना अनुक्रमे १ लाख ८ हजार, ५४ हजार, २७ हजार आणि उत्तेजनार्थ ७ जणांसाठी ९ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले.
या अष्टमंगल सजावट स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्रीती भंडारी यांना तर, द्वितीय पारितोषिक रुचिरा संचेती यांना मिळाले. तृतीय पारितोषिक उचित लुंकड यांना मिळाले. याबरोबरच उत्तेजनार्थ पारितोषिक अमित लोढा, अनिकेत चुत्तर, दर्शन सिंघवी, देशना गांधी, रमेश चोरडिया, सुरभी धोका आणि सुशीला संचेती यांना मिळाले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंगेश व शिल्पा कटारिया, दिनेश सरनोत, मनोज धोका, विनोद व राखी लुंकड, शशिकांत व अचला भंडारी, विशाल व स्मिता जैन, अशोक भंडारी, महावीर चोरडिया, हेमंत रायसोनी, राजेश नहार, रेखा कांगटानी, राहुल डागलीया, सचिन जैन यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपल्याकडे माणसांचे उत्सव आहेत. इतिहास, युद्ध, जन्म व मृत्यूचेही उत्सव आहेत. परंतु, वैचारिक मूल्यांचा उत्सव आपल्याकडे होत नाही. क्षमा, संयम, तप या मूल्यांचे महत्व आदिकाळापासून आहे. त्यामुळे या पर्युषण पर्वामध्ये या मूल्यांचा महोत्सव साजरा करण्याचे आवाहन जैन धर्मगुरु प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांनी केले होते.
या पर्युषण पर्वात घर, दुकान, कार्यालय, उद्योग, शाळा, कॉलेज अशा सर्व ठिकाणी अष्टमंगलची स्थापना करून पर्युषण पर्व उत्साहात साजरे केले. सकाळी व संध्याकाळी मित्र परिवार, नातेवाईक अशा सर्वांसोबत जे कोणी दुखावले गेले असेल त्यांची क्षमा मागून दुसऱ्याला क्षमा देखील करण्यात आली. सात दिवस प्रत्येक दिवशी एका रंगाचे वस्त्र परिधान केले गेले.
अष्टमंगल सजावट स्पर्धेतून मानवी मूल्यांचा उत्सव साजरा : विजय भंडारी
युगल धर्म संघाच्या वतीने प.पू. प्रवीणऋषीजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पर्युषण पर्वचा महोत्सव साजरा करण्यासाठी नियोजन केले गेले. प्रत्येक घर, दुकान, शाळा, उद्योगाच्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यासाठी लागणाऱ्या अष्टमंगल मूर्ती पोहोचविण्यात आल्या. या सजावट स्पर्धेतून महाराज साहेबांनी सांगितलेल्या मानवी मूल्यांचा उत्सव साजरा करण्यात आला. आणि यातून विजयी झालेल्या स्पर्धकांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
