बंडगार्डन येथील घटना, आगीत इलेक्ट्रीक, पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग येथील तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या टिव्हीएस कंपनीच्या शोरुम व सर्व्हिस सेंटरला सोमवारी रात्री भीषण आग लागली. त्यात तेथील इलेक्ट्रिक व पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही अर्ध्या तासात आटोक्यात आणली.
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री ८ वाजून ३८ मिनिटांनी ताराबाग येथील तळमजल्यावरील सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची वर्दी मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाच्या नायडु व येरवडा अग्निशमन केंद्रातून वाहन व मुख्यालयातील एक वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आला.
टिव्हीएस कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला जाण्यासाठी पाठीमागून रस्ता आहे. आग लागल्यानंतर धूर आत कोडला गेला होता. बाहेर धूर दिसू लागल्यानंतर आग लागल्याचे समजले. तोपर्यंत आग भडकली होती.
सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून दुचाकी वाहनांने पेट घेतल्याने प्रचंड धुर निर्माण झाला होता. जवानांनी प्रथम आत कोणी अडकले आहे का याची खात्री केली. त्यात एक जण धुरामुळे इमारतीच्या टेरेसवर गेल्याचे लक्षात आले. त्याला जवानांनी सुरक्षित बाहेर काढले.
धूर जास्त प्रमाणात असल्याने श्वसन यंत्र परिधान करुन जवानांनी पाण्याचा मारा करत सुमारे अर्धा तासात आग आटोक्यात आणली. या आगीत ६० दुचाकी जळाल्या. त्यामध्ये काही नवीन आणि काही दुरुस्ती करीता आलेल्या दुचाकींचा समावेश आहे.
या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग, यंत्र सामुग्री, बॅटरी, वाहनांचे सुटे भाग, संगणक, सोफा, एसी टेबल खुर्च्या, कागदपत्रे आगीत जाळली आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
