“एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा निर्णय : गणेशोत्सवात डीजे–डॉल्बीवर बंदी”
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले. “No DJ – No Dolby” ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार असून गणेश मंडळांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या निर्णयाचे स्वागत करत बार्शीचे आमदार श्री. दिलीप सोपल यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
नियोजन भवन येथे घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलीस उपअधीक्षक शिरीष हुंबे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, मूर्ती विक्रेते व डॉल्बी धारक उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, “गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव असून तो शांततेत आणि उत्साहात साजरा करणे आवश्यक आहे. डीजे-डॉल्बीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण, लहान मुले, वृद्ध व रुग्णांना होणारा त्रास टाळण्यासाठी यावर्षी जिल्हाभर ‘No DJ – No Dolby’ ही योजना राबविण्यात येईल. तसेच मंडळांनी गावामध्ये CCTV बसविणे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत.” उपस्थित गणेश मंडळांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवून सहकार्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, बार्शी तालुक्यातील कर्णकर्कश डीजे आणि लेझर लाईट्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे आमदार दिलीप सोपल यांनी स्वागत केले. त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात भेट देऊन या निर्णयाबाबत अभिनंदन केले. आमदार सोपल म्हणाले, “आपण दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि तात्काळ अंमलबजावणी मनःपूर्वक स्वागतार्ह आहे. बार्शी तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांतर्गत हा निर्णय प्रभावीपणे राबवला जात आहे.”
तसेच, न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेबरोबरच लेझर लाईट्सवर बंदी कडकपणे अंमलात आणावी, विविध उत्सवांच्या मिरवणुकीचे एकत्रित वेळापत्रक ठरवावे, ज्यामुळे वाहतूक कोंडी, बाजारपेठ बंद होणे आणि नागरिकांना होणारा त्रास टाळता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार सोपल यांनी स्पष्ट केले की, डीजे बंदी, लेझर लाईट्स बंदी आणि मिरवणुकीच्या नियोजनाबाबत पोलीस अधीक्षकांनी घेतलेले लोकाभिमुख निर्णय खरंच कौतुकास्पद असून समाजहितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
