लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट चौकात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, सीपीआर व वेळेवर उपचारांमुळे जीव वाचला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर उसळलेल्या गर्दीत सोमवारी सायंकाळी एका पीएमपी बसचालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान राखून वाहतूक पोलिसांनी तत्काळ सीपीआर देत तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.
अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41, रा. वारजे माळवाडी) असे या बसचालकाचे नाव असून, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. पुणे स्टेशन ते कुंबरे पार्क (कोथरूड डेपो) अशी बस लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिससमोरील सिग्नलला थांबली असता अंबुरे यांना हृदयविकाराचा झटका आला. बसमधील प्रवासी भयभीत होऊन आरडाओरडा करू लागले.
यावेळी बेलबाग चौकात वाहतूक नियमनाचे काम करणारे पोलिस अंमलदार रोमेश ढावरे आणि अर्चना निमगिरे यांनी धाव घेऊन चालकाला बाहेर काढले. ढावरे यांनी तातडीने सीपीआर देत अंबुरे यांना शुद्धीवर आणले.
रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे व उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या सूचनेनुसार, रिक्षाचालक राजेश शंकर आरकल यांच्या रिक्षेतून त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तातडीने उपचार केल्याने अंबुरे यांचे प्राण वाचले. योग्य वेळी प्रसंगावधान दाखवून जीव वाचविल्याबद्दल पोलिस अंमलदार रोमेश ढावरे आणि अर्चना निमगिरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
