गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचा गोफ चोरला, पर्वती पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बालाजीनगर ते एस टी कॉलनी बीआरटी बसस्टॉपदरम्यान बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन ज्येष्ठाच्या गळ्यातील ५ तोळ्याचा सोन्याचा गोफ चोरणार्या दोघा चोरट्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अमर शंकर जाधव (वय ३८, रा. पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड) आणि निलेश शंकर जाधव (वय ३६, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत शिवाजी पोपटराव देशमुख (वय ७१, रा. सावंत प्लाझा, बालाजीनगर) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते पुणे महापालिकेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
ते ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बालाजीनगर येथून कात्रज ते कोथरुड या बसने कोथरुडला जात होते. बसमध्ये गर्दी असल्याने ते चालकाच्या पाठीमागील बाजूस बसचे स्लायउिंग दरवाज्याचे पॅसेजमध्ये उभे होते. के के मार्केटला बसस्टॉपला बस थांबली. काही प्रवासी बसमध्ये बसले. त्यामुळे बसमध्ये लोकांची खूप गर्दी झाली.
भापकर पेट्रोलपंप येथील बीआरटी बसस्टॉपला बस थांबली असता त्यांच्या आजू बाजूचे लोक बसमधून उतरुन गेले. बस सुरु झाल्यावर त्यांनी गळ्याला हात लावून पाहिला तेव्हा त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ नसल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी १ लाख ३२ हजार रुपयांचा ५ तोळ्याचा गोफ चोरुन नेला होता.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तपास करत होते. पोलीस अंमलदार सद्दाम शेख यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत चोरट्यांविषयी माहिती मिळाली.
या माहितीवरुन पोलिसांनी अमर जाधव व निलेश जाधव यांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून सोन्याचा गोफ ताब्यात घेतला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, सद्दाम शेख, मनोज बनसोड, महेश मंडलिक, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, अमित चिव्हे, नानासो खाडे व राकेश सुर्वे यांनी केली आहे.
