मलठण फाट्यावरील घटना : जामीन मिळताच महिलांच्या गळ्याला कोयता लावून लुबाडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जामीन मिळाल्यानंतर दोन दिवसांनी सातारा शहरात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तिचे मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडताना झालेल्या चकमकीत या गुन्हेगाराचा मृत्यू झाला. गुन्हेगाराने केलेल्या हल्ल्यात पोलीस हवालदार सुजित भोसले हे जखमी झाले आहेत. पुणे – अहिल्यानगर महामार्गावरील मलठण फाटा येथे शनिवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांवर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लखन पोपट भोसले (वय ३२, रा. वडगाव पुसवळे, ता. जि. सातारा) असे एन्काऊंटर झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. लखन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे ग्रामीण, सातारा, सांगली यासह अनेक ठिकाणी खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल ३५ गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत.
यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली होती. २०२२ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला होता.
जामीन मिळाल्यानंतर दोनच दिवसांनी, २८ ऑगस्ट रोजी, त्याने सातारा शहरातील कृष्णानगर परिसरात छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीजवळ मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांना अडवले.
त्यातील एक महिला पळून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या उतारावर पडली. तिच्या गळ्याला कोयता लावून तिचे मंगळसूत्र हिसकावून घेतले होते. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्याचबरोबर, कोरेगाव तालुक्यातील भिवडी येथे सातारा – लातूर महामार्गावरही महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून लखन भोसले फरार झाला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी सातारा पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना करून लखनचा शोध सुरू केला होता. शिक्रापूर येथील मलठण फाटा परिसरात तो नातेवाईकांकडे आल्याची खबर सातारा पोलिसांना मिळाली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामराव काळे, पोलीस हवालदार सुजित भोसले आणि तुषार भोसले हे त्याला पकडण्यासाठी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मलठण फाटा येथे दाखल झाले. पोलिसांना पाहताच लखन याने हवालदार सुजित भोसले आणि तुषार भोसले यांच्यावर चाकूने हल्ला केला.
त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला.त्यात भोसले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलिसांवर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
