खडकी व मुंढवा पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांची तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी खडकी व मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खडकी परिसरातील एका तरुणीची चोरट्यांनी ऑनलाइन टास्कच्या आमिषाने ४ लाख १६ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत तिने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीच्या मोबाईलवर चोरट्यांनी संदेश पाठवून घरातून ऑनलाइन कामाची ऑफर दिली होती.
सुरुवातीला तिला काही छोटे टास्क दिले गेले व त्याच्या बदल्यात परताव्यापोटी रक्कम देखील मिळाली. त्यामुळे तिचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी आणखी पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यावरून तरुणीने २६ ते ३१ जुलैदरम्यान ४ लाख १६ हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले. मात्र नंतर चोरट्यांचे मोबाईल बंद आढळून आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम करत आहेत. अशाच प्रकारे एका तरुणाची ३ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक झाली असून त्याने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम करत आहेत.















