रेकी करणारा व पिस्तुल पुरविणार्यास अटक : कृष्णा आंदेकरसह ८ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंबेगाव पठार परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारा व मोबाईलमध्ये घरांचे फोटो काढणारा एक तरुण स्थानिकांनी पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या हवाली केला. त्याच्या चौकशीतून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्याचा कट उघडकीस आला आहे. पोलिसांनी हा रेकी करणारा आंदेकर टोळीतील सदस्य दत्ता काळे व पिस्तुल पुरविणारा एक आरोपी यांना अटक केली आहे. आंदेकर टोळीतील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्ता बाळू काळे (रा. डोके तालीम मागे, गणेश पेठ), कृष्णा आंदेकर (रा. नाना पेठ), यश मोहिते (रा. नाना पेठ), अमन पठाण (रा. नाना पेठ), यश पाटील, सुजल मिरगु, अमित पाटोळे, स्वराज वाडेकर (सर्व रा. नाना पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वनराज आंदेकर यांचा १ सप्टेंबर २०२४ रोजी खून झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने कट रचला होता. दत्ता काळे याची तुरुंगात ओळख झाली होती. त्यातून त्याला रेकी करण्यासाठी आंबेगाव पठार येथे पाठविण्यात आले. तेथे त्याने भाड्याने रूम घेतली.
३१ ऑगस्ट रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार चौधरी, चोरमोले, सागर बोरसे हे पेट्रोलिंग करत असताना आंबेगाव पठार येथील सूर्या चौकात त्यांना बातमीदाराने माहिती दिली की, एक जण दोन दिवसांपासून संशयास्पदरीत्या फिरत असून मोबाईलमध्ये फोटो काढत आहे. त्याला स्थानिकांनी पकडून आंबेगाव पोलिस चौकीत आणले. पोलिसांनी नाव विचारले असता त्याने आपले नाव दत्ता काळे असे सांगितले.
अधिक चौकशीत त्याने सांगितले की, २०१८ मध्ये येरवडा कारागृहात असताना त्याची स्वराज वाडेकर याच्याशी ओळख झाली होती. तो ३० जुलै २०२३ नंतर बाहेर आल्यावर आंदेकर टोळीत सामील झाला व छोटी-मोठी कामे करू लागला.
कृष्णा आंदेकर हा त्याला राहण्यासाठी खोली व खर्चासाठी पैसे देत होता. वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी यश मोहिते हा गेल्या ३ महिन्यांपासून आंबेगाव पठार येथील आरोपींच्या घरांची रेकी करत होता.
२९ ऑगस्ट २०२५ रोजी कृष्णा आंदेकर याने दत्ता काळेला ५ हजार रुपये देऊन आंबेगाव पठार परिसरात रूम भाड्याने घेऊन रेकी करण्यास सांगितले. त्यानुसार तो भाड्याने रूम घेऊन आरोपींच्या घरांची रेकी करत होता.
त्याने वनराज आंदेकर यांचा खून करणाऱ्या गुन्हेगारांची घरे पाहून त्याबाबत कृष्णा आंदेकर याला रात्री १० वाजता व्हॉट्सअॅप कॉलवर माहिती दिली. तो अमन पठाण याला ती माहिती देणार होता, मात्र दुसऱ्या दिवशी तो आला नाही. त्यामुळे त्याने यश पाटील याला कळविले.
यानंतर दुपारी साडेबारा वाजता कृष्णा आंदेकर याने कॉल करून अमन, दत्ता काळे, यश मोहिते, यश पाटील, सुजल मिरगु, अमित पाटोळे व स्वराज वाडेकर यांना ५ शस्त्रे देऊन पाठविले असल्याचे सांगितले.
अमन याने दत्ता काळेला कॉल करून लक्ष ठेव, बाहेर आला की कळव, असे सांगितले होते. पोलिसांनी दत्ता काळे याच्या फोनची तांत्रिक तपासणी केली. त्यातून कृष्णा आंदेकर व अमन यांच्याशी त्याचा मोबाईल संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत एक पिस्तुल जप्त केले असून दोघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा व भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.















