एकच ब्रँड दोघांना विकून ११ कोटींची कमाई : मुळ संचालक दक्षिण कोरियाला फरार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ‘कॅफे पिटर’ या हॉटेल ब्रँडच्या विक्री व्यवहारात २ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा ब्रँड ५ कोटी रुपयांना विक्रीचा करार करून त्यापैकी २ कोटी रुपये स्वीकारल्यानंतरही संबंधित संचालकाने तोच ब्रँड दुसऱ्या व्यक्तीस अवघ्या १० लाख रुपयांना पुन्हा विकला. त्यानंतर फ्रेंचायझी देत सुमारे ११ कोटी रुपयांची कमाई करून मूळ संचालक दक्षिण कोरियाला पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात चॅन सिओक जंग उर्फ पीटर जंग (वय ५९, रा. प्लॅटिनम ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी, मूळ रा. दक्षिण कोरिया) आणि कमलेश मारुती काळे (वय ३८, रा. कॅफे पीटर, गायकवाड पेट्रोलपंपाजवळ, औंध) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्वेता सचिन साळुंखे (वय ३५, रा. विशालनगर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३१ मार्च २०२२ पासून आतापर्यंत बंडगार्डन येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्वेता साळुंखे या युमसिंग फूडवर्क प्रा. लि. या कंपनीच्या संचालिका असून २०२१ पासून त्या हॉटेल व्यवसाय करीत आहेत. त्यांचे कार्यालय कल्याणीनगर येथे आहे. त्यांच्या कंपनीने ‘कॅफे पिटर’ हा हॉटेल व्यवसायाचा ब्रँड रेलिफा फूडवर्क एलएलपी कडून खरेदी करण्याचा व्यवहार केला होता.
कोरियन नागरिक चॅन सिओक जंग याच्याकडून पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे हा ब्रँड ५ कोटी रुपयांना हस्तांतरित करण्याचे ठरले होते. त्यापोटी २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपये देण्यात आले होते. तसेच सर्व फ्रेंचायझीची एनओसी, प्रलंबित देयके आणि इतर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते.
हा ब्रँड १२ जुलै २०२४ पासून कॅफे पिटर युमसिंग फूडवर्क या कंपनीच्या नावावर अधिकृतपणे ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, चॅन सिओक जंग याचा व्हिसा संपल्याने त्याने ३१ मार्च २०२२ रोजी कॅफे पिटरचे तत्कालीन संचालक किरण शिंदे यांना पॉवर ऑफ अॅटर्नी दिली होती.
त्यानंतर फिर्यादींनी ब्रँड खरेदी केला असताना पुण्यात २९ फ्रेंचायझी सुरू होत्या. २०२५ मध्ये फ्रेंचायझी करार संपल्यानंतर पुढील करारासाठी सर्व फ्रेंचायझीधारकांना बैठकीसाठी बोलावले असता हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
तपासात असेही समोर आले की, चॅन सिओक जंग याने त्याच वेळी हा ब्रँड दुसऱ्या व्यवहारातून अवघ्या १० लाख रुपयांना विकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधितांनी नवीन फ्रेंचायझी सुरू करून विविध ठिकाणी आऊटलेट उघडले.
फिर्यादींनुसार, जंग व कमलेश काळे यांनी मिळून स्वतःची आऊटलेट तसेच इतर फ्रेंचायझीधारकांकडून दमदाटी करून रॉयल्टी वसूल केली. काही आऊटलेट बंद पाडल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.
तसेच युमसिंग फूडवर्क कंपनीकडे ब्रँडचे कायदेशीर अधिकार असतानाही परवानगी न घेता नवीन आऊटलेट सुरू करून डिपॉझिट, ब्रँड फी आणि रॉयल्टीच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
२०२४ पासून निगडी, फिनिक्स मॉल, वाकड, कर्वेनगर, पुनावळे आणि कोथरूड येथे ‘कॅफे पिटर’च्या नावाने बेकायदेशीर फ्रेंचायझी सुरू करून त्यातून नफा मिळविल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डांगे करीत आहेत.
















