दगडशेठ हलवाई दुपारी ४ वाजता येणार बेलबाग चौकात : पोलिसांचे विसर्जन मिरवणुकीचे सुक्ष्म नियोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दोन मंडळात पडणारे अंतर, मानाच्या गणपतींबरोबर असणारा भला मोठा लवाजमा, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला लागणारा भरपूर वेळ यामुळे रंगाळणारी विसर्जन मिरवणुक, असे नेहमीचे चित्र दिसून येते़ विसर्जन मिरवणुकीच्या लांबणार्या वेळांवर होणारी टिका टाळण्यासाठी यंदा पुणे शहर पोलीस दलाने मानाचा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यानुसार सकाळी साडेनऊ वाजता ग्रामदेवता कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होणार असून सव्वा पाच तासात ते टिळक चौकात पोहचतील, असे नियोजन पोलिसांनी केले आहे.
मानाच्या सर्व गणपतींना सव्वा पाच ते सहा तास इतका वेळ देण्यात आला असून त्या प्रत्येक मंडळाने आपला गणपती कोणत्या चौकात किती वाजता आला पाहिजे, याचे नियोजन पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यानुसार दगडशेठ हलवाई गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकात येणार आहे.
प्रत्येक मंडळापुढे जास्तीतजास्त २ ढोल पथके असतील. प्रत्येक पथकामध्ये वादक व त्यांच्या मदतीस सहायक मिळून एकूण ६० सदस्य राहतील. सर्व निर्णय हे पुर्णपणे सर्व गणेश मंडळांना विश्वासात घेऊन घेण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
विसर्जन मिरवणुकीसाठी मानाच्या गणपतींसाठी दिलेला वेळ
गणपती मंडळ – बेलबाग चौक ते टिळक चौक एकूण वेळ
कसबा गणपती – १०. १५ ते २.४५ – ५ तास १५ मिनिटे
तांबडी जोगेश्वरी – १०.३० ते ३.०० – ५ तास १५ मिनिटे
गुरुजी तालीम – ११.०० ते ३.३० – ५ तास ३० मिनिटे
तुळशीबाग – ११.३० ते ४.०० – ५ तास ४५ मिनिटे
केसरीवाडा – १२.०० ते ४.३० – ६.०० तास
दगडुशेठ हलवाई – १६.०० ते १९.३० – ३ तास ३० मिनिटे
इतरांच्या अगोदर यंदा श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती
विसर्जन मिरवणुकीत सर्वांना सर्वाधिक प्रतिक्षा असते ती श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीची. त्याच्या अगोदर जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबु गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ हे गणपती मंडळे असतात. यंदा यांच्या अगोदर दगडुशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून दुपारी ४ वाजता पुढे जाणार आहे. त्यानंतर लक्ष्मी रोड, शिवाजी रोडवरील गणपती मिरवणुकीत सामील होतील. सायंकाळी साडेपाच ते सायंकळी ७ वाजेपर्यंत जिलब्या मारुती, हुतात्मा बाबु गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडई मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ७ वाजल्यानंतर विद्युत रोषणाई असलेली मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
- मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडला मार्गस्थ होतील. त्यानंतर ६ व्या क्रमांकावर महापालिका गणपती मंडळ व ७ व्या क्रमांकावर त्वेष्ठा कासार गणपती हे दुपारी १ वाजेपर्यंत बेलबाग चौकातून पुढे मार्गस्थ होतील.
- त्यानंतर शिवाजी रोड, लक्ष्मी रोडवरील मंडळे बेलबाग चौकातून पावणे चार वाजेपर्यंत मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
- दुपारी चार वाजता श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे बेलबाग चौकात आगमन होईल.
- त्यानंतर रांगेतील मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
- साडेपाच वाजेनंतर जिलब्या मारुती गणपती, हुतात्मा बाबु गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई गणपती मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.
- सायंकाळी ७ वाजेनंतर विद्युत रोषणाईचे मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील.
- मानाचे गणपती मिरवणुकीमध्ये टिळक पुतळा मंडई ते बेलबाग चौक दरम्यान कोणतेही ढोलताशा पथक वाद्य वाजविणार नाहीत. बेलबाग चौकापासून ढोलताशा पथके मिरवणुकीमध्ये सामील होऊन वाद्य वाजवतील.
- गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये मंडळासोबत डी जे अथवा ढोल ताशा पथक पैकी एकाचीच परवानगी राहील.
- कोणतेही मंडळाचे ढोल ताशा पथक हे स्थिर वादन करणार नाही.
- टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर कोणतेही मंडळ आपली मिरवणुक सकाळी साडेदहा च्या पूर्वी सुरु करणार नाही.















