हडपसर पोलिसांनी उघडकीस आणले पाच गुन्हे : ७ लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरात वाढत्या चैन स्नॅचिंगच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हडपसर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करून पाच गुन्ह्यांचा छडा लावला. त्यांच्या ताब्यातून ४ लाख ५४ हजार रुपयांचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण ७ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे अनिकेत विजय चव्हाण (वय २४, रा. सज्जगड, कामधेनू इस्टेट, हडपसरगाव, मूळ रा. खुणेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण (वय २३, रा. खुणेश्वर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी आहेत. विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर चव्हाण याच्यावर यापूर्वी हडपसर, वानवडी, सिंहगड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ व समर्थ पोलीस ठाण्यात चैन स्नॅचिंगचे तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून हडपसर परिसरात चैन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी महिलांना लक्ष्य केले जात होते. या घटना प्रामुख्याने सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ या वेळेत पुणे-सोलापूर रोडवरील शेवाळवाडी, भाजी मार्केट, महादेव मंदिर, गाडीतळ, हडपसर व मांजरी परिसरात घडत असल्याचे आढळले. गुन्हा केल्यानंतर पुणे-सोलापूर रोडने सहज पसार होण्याची सोय असल्याने हा परिसर चोरट्यांनी निवडल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या पार्श्वभूमीवर १८ ऑगस्ट रोजी तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार महावीर लांढे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत हडपसरमधील पाच चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले.
त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, बनावट नंबर प्लेट, स्क्रू ड्रायव्हर, मास्क आणि सॅक असा एकूण ७ लाख ४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, अश्विनी जगताप यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, तसेच अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लांढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी बजावली.
