घरगुती वादातून जीव घेण्याचा प्रयत्न : शनिवार पेठेतील प्रकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहर पोलीस दल गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात गुंतलेले असताना शनिवार पेठेत धक्कादायक प्रकार घडला. ६५ वर्षीय मुलाने घरगुती वादातून आपल्या ८० वर्षांच्या आईवर चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत फिर्याद भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. अंकुश सोसायटी, मेहुणपुरा, शनिवार पेठ) यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी अविनाश पांडुरंग साप्ते (वय ६५, रा. त्याच सोसायटीत) याला ताब्यात घेतले.
या घटनेत वृद्ध महिला कुसुम साप्ते (वय ८०) आणि फिर्यादी आशिष समेळ दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे दहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश साप्ते, त्यांची आई कुसुम साप्ते आणि भाचा आशिष समेळ हे एकाच घरात राहतात. याआधीही घरगुती कारणांवरून त्यांच्यात वाद होत असत. शनिवारी रात्री अविनाश साप्ते दारू पिऊन घरी आले आणि त्यांनी आईवर तोंड व डोक्यात चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले.
आजीला वाचविण्यासाठी भाचा आशिष समेळ मध्ये पडल्यावर त्यांच्यावरही अविनाश यांनी हल्ला करून जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कारके करीत आहेत.
