पावणे दोन लाखांचे १३ मोबाईल जप्त : फरासखाना पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेऊन महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार रुपयांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले.
अलीम मुस्ताक शेख (वय २६, रा. मालेगाव, जि. नाशिक), अत्तर अमद एजाज अहमद (वय २५, रा. मुस्लीमनगर, मालेगाव, जि. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांचे बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, बुधवार चौक येथे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी फरासखाना पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी तपास पथकाला त्याचा शोध घेण्याविषयी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. पोलीस अंमलदार तानाजी नांगरे व गजानन सोनुने यांच्या गोपनीय बातमीवरून पोलीस पथकाने पासोड्या विठोबा मंदिराजवळ अलीम शेख व अत्तर अहमद यांना पकडले.
त्यांच्या ताब्यातून १ लाख ७८ हजार रुपयांचे १३ वेगवेगळ्या कंपनींचे महागडे फोन जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक महेबुब मोकाशी तपास करीत आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम नावाडे, अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, अरविंद शिंदे, महेबुब मोकाशी, कृष्णा निढाळकर, पोलीस अंमलदार तानाजी नांगरे, नितीन तेलंगे, नितीन जाधव, गजानन सोनुने, महेश पवार, चेतन होळकर, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, प्रशांत पालांडे, सुमित खुट्टे, शशिकांत ननावरे, वशिम शेख, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे.















