महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री बडमाता मंदिर संस्था, मुंढवा यांच्या अध्यक्षपदी डॉ. राजकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बडमाता मंदिर संस्थानची निवडणूक रीतसर पार पडली. निवडणूक अधिकारी पवन श्रीमाळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी फक्त एकच नामांकन अर्ज प्राप्त झाला होता. तो नियम व निवडणूक प्रक्रियेनुसार ग्राह्य धरून पुणे, सुखसागरनगर येथील राजकुमार कांतिलालजी लोढा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
डॉ. राजकुमार लोढा यांनी यापूर्वी जेजुरी संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यावेळी संस्थानच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण व धोरणात्मक निर्णय घेतले होते. त्याच अनुभवाचा उपयोग बडमाता मंदिर संस्थानच्या विकासासाठी होईल, असा विश्वास माजी अध्यक्ष मेघराज लोढा यांनी व्यक्त केला.
“धार्मिक, सेवाभावी व समाजसेवेसाठी समर्पित व्यक्ती या पदावर निवडून आल्याने समाजाला अभिमान वाटतो,” असेही ते म्हणाले. जेजुरी मार्तंड देवस्थानमधील अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना डॉ. लोढा यांनी समाज व हिंदू धर्माप्रती असलेली निष्ठा आणि सेवा विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
या निवडीनंतर सकल जैन समाज तसेच मित्रपरिवाराकडून डॉ. राजकुमार लोढा यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.















