पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एमपीडीए अंतर्गत कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पद्मावती तळजाई परिसरात दहशत माजवून गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
साहिल गणेश वायदंडे (वय २५, रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. साहिल वायदंडे हा २०२२ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याच्याविरुद्ध मालमत्तेविरुद्ध व शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
घातक हत्यारे जवळ बाळगणे, दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, घातक हत्यारे जवळ बाळगून तोडफोड करणे यासारख्या ५ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. साहिल वायदंडे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणुकीत काहीही फरक पडला नाही.
तो अत्यंत क्रूर, खुनशी व भांडखोर असून लोकांमध्ये कुरापती काढून मारहाण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. त्याच्या दहशतीमुळे लोक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. सहकारनगर पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.
या प्रस्तावावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश १२ ऑगस्ट २०२५ रोजी दिला होता. तेव्हापासून साहिल वायदंडे हा फरार झाला होता. पोलीस अंमलदार अमोल पवार यांना साहिल वायदंडे हा स्वारगेट येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी त्याला स्वारगेट भागातून ताब्यात घेऊन ८ सप्टेंबर रोजी त्याच्यावर स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्याची वर्धा कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सद्दामहुसेन फकीर, फिरोज शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, गोरख ढगे, हरिश्चंद्र चोरमले, मारोती नलवाड, किरण कांबळे, विनायक एडके, सागर सुतकर, अमित पदमाळे, महेश भगत यांनी केली आहे.















