अपघातानंतर केली होती मारहाण, दोन अल्पवयीन ताब्यात : सहकारनगर पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाईची मागणी करून मारहाण करून दोन मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत.
अनिकेत गणेश शिंदे (वय १९, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता सातारा रोडने जात होते. कात्रजकडून दुचाकीवरून तिघे आले आणि त्यांनी फिर्यादीच्या गाडीला धडक दिली. ते खाली पडले.
फिर्यादी खाली उतरले असता, त्यांनी “आमच्या पायाला लागले आहे, १० हजार रुपये नुकसानभरपाई द्या” असे सांगून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील दोन मोबाईल चोरून नेले.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार आणि अमित पदमाळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा करणारे ट्रेझर पार्क येथे एका दुचाकीवर बसले आहेत.
पोलिसांनी तातडीने तेथे पोहोचून तिघांना ताब्यात घेतले. अनिकेत शिंदे याला अटक करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सद्दाम हुसेन फकीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अमित पदमाळे, बजरंग पवार, निलेश शिवतरे, संदीप कोळगे, रफिक तडवी, किरण कांबळे, अभिमान बागलाणे, महेश भगत, सागर सुतकर यांनी केली आहे.
