सूर्यदत्त आंतरराष्ट्रीय मेडिएशन केंद्र व रॅडँक्स लिमिटेडतर्फे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : “दिवसेंदिवस मेडिएशनचे क्षेत्र विस्तारत असून, कुशल आणि प्रमाणित मेडिएटर्सची गरज वाढत आहे. प्रशिक्षित मेडिएटर्सची संख्या वाढल्यास न्यायव्यवस्थेवरील भार कमी होईल, पक्षकारांचा वेळ व पैसा वाचेल आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा गतीने होईल. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत,” असे प्रतिपादन लंडनस्थित रॅडँक्स लिमिटेडच्या संस्थापिका, आंतरराष्ट्रीय मेडिएटर व कायद्याच्या अभ्यासक डॉ. रेणू राज यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल मेडिएशन सेंटर (एसआयएमसी) आणि लंडनमधील रॅडँक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बन्सीरत्न सभागृहात झाले.
कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालय मध्यस्थ संघटनेचे अध्यक्ष आर. संथानकृष्णन, संसदेचे माजी संयुक्त सचिव प्रदीप चतुर्वेदी, रॅडँक्स लिमिटेडचे मेडिएटर आर. पी. मिश्रा व अजयकुमार लाल, विश्वशांती दूत डॉ. सुधीर तारे, आयोजक व सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष सिद्धांत चोरडिया, प्राचार्य प्रा. केतकी बापट, डॉ. मोनिका सेहरावत, डॉ. सदानंद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. रेणू राज म्हणाल्या, “भारतासह जगभरात न्यायालयात जाण्यापूर्वी मेडिएशन अनिवार्य करण्याकडे पावले उचलली जात आहेत. ४५ तासांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रॅडँक्सकडून आंतरराष्ट्रीय मान्यतेचे प्रमाणपत्र दिले जाईल, ज्यामुळे जगभरात मेडिएटर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.”
आर. संथानकृष्णन म्हणाले, “मेडिएशन ही पर्यायी न्यायनिवाड्याची प्रभावी यंत्रणा असून, ती पक्षकारांचा वेळ व पैसा वाचवून संबंध टिकवते. प्रशिक्षित मेडिएटर्सची फळी निर्माण झाल्यास न्यायव्यवस्थेतील बदलाला गती मिळेल.”
प्रदीप चतुर्वेदी यांनी सांगितले, “देशातील लहानमोठे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. सर्टिफाईड मेडिएटर्सची संख्या वाढल्यास हे वाद जलद मार्गी लागतील. सूर्यदत्त व रॅडँक्सच्या पुढाकारामुळे देशाला कुशल मेडिएटर्सची मोठी फळी मिळेल.”
सोहळ्यात प्रा. केतकी बापट, डॉ. मोनिका सेहरावत, डॉ. सुधीर तारे, आर. पी. मिश्रा, अजयकुमार लाल यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन ग्रीष्म सुराणा, चिन्मय सूळ व अल्फीया मुलानी यांनी केले.
ऑगस्ट २०२५ मध्ये सूर्यदत्त व रॅडँक्स यांच्यात सामंजस्य करार झाला. त्याचे पुढील पाऊल म्हणून भारतातील पहिला अभ्यासक्रम सूर्यदत्तमध्ये सुरू करण्याची संधी मिळाली. भारतीय तरुणांना जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली मेडिएटर बनण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.” – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये –
सूर्यदत्त विधी महाविद्यालयातील बीएएलएलबी, बीबीएएलएलबी आणि एलएलबी विद्यार्थ्यांसाठी हा फाउंडेशन प्रोग्रॅममाफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
४५ तासांच्या पुढील प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
या कार्यक्रमात सूर्यदत्त कॅम्पसच्या विविध शाखांतील हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.
