पोलिसांनी घेतली बंडु आंदेकरच्या घराची झाडाझडती, वाडेकर यांच्या घरावरही छापा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष गणेश कोमकर याचा निर्घृण खून करणाऱ्या आंदेकर टोळीविरोधात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बंडु आंदेकर आणि वृंदावनी वाडेकर यांच्या घरांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
बंडु आंदेकर यांच्या घरातून पोलिसांनी तब्बल ७७ तोळे सोने (अंदाजे ६७ लाख रुपये), २ लाख ४५ हजार ३१० रुपये रोकड, ३१ हजार रुपयांचे चांदीचे दागिने, बँक पासबुक, चेकबुक, सीसीटीव्ही डीव्हीआर, सोनाई दादा फाऊंडेशनचे लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड, शॉप अॅक्ट लायसन्स तसेच २ लाख रुपये किंमतीची वोक्सवॅगन कार असा मिळून अंदाजे ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, वृंदावनी निलंजय वाडेकर, तुषार निलंजय वाडेकर व स्वराज निलंजय वाडेकर यांच्या घरांची झडती घेतली असता, सोन्या-चांदीचे दागिने, २१ हजार रुपये रोकड, १६ मोबाईल फोन, २ टॅब, ७ पेनड्राईव्ह, १ मेमरी कार्ड, प्रॉपर्टीचे साठेखत, कुलमुखत्यार पत्र, स्वराज वाडेकरच्या नावावरची २० हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर मोटारसायकल आणि सोन्याच्या पावत्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बंडु आंदेकर टोळीला प्रामुख्याने हप्ता वसुलीतून गेली अनेक दशके दरमहा मोठ्या प्रमाणावर आर्थिक पुरवठा होत आला आहे. या अवैध वसुलीतून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता मिळविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मिळालेल्या कागदपत्रे व मोबाईलमधील माहितीवरून टोळीच्या आर्थिक पुरवठ्याचे स्रोत उघड होण्याची शक्यता असून, त्या नाड्या आवळण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
