२३ ते ३० सप्टेंबर दरम्यान विविध आध्यात्मिक कार्यक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आदिशक्ती सच्चियायमाता देवींच्या पावन नवरात्री निमित्त श्री सुसवाणीमाता सच्चियायमाता चॅरिटेबल ट्रस्ट, जैन आगम मंदिर कात्रज पुणे व स्व. माणिकचंदजी दुगड यांच्या स्मृति प्रीत्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यनगरीच्या सांस्कृतिक वैभवात भक्तीरंगाची उधळण करणारा हा सोहळा २३ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आगम जैन मंदिर समोर, श्री दुगड जीवदया संस्था, कात्रज, पुणे येथे पार पडणार आहे.
या आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवात दररोज नाम, ज्ञान आणि प्रेमदानाच्या कीर्तनाची मैफिल रंगणार आहे. यामध्ये मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी युवा चैतन्य ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर, २४ सप्टेंबर रोजी विद्यावाचस्पती ह.भ.प. सचिन महाराज पवार, २५ सप्टेंबर रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर, २६ सप्टेंबर रोजी महंत गुरुवर्य श्री महादेव महाराज शास्त्री (जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम), तसेच २७ सप्टेंबर रोजी आवाजाचे जादूगार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ह.भ.प. गणेश महाराज भगत यांचे काल्याचे कीर्तन रात्री ९ ते ११ वाजता होणार आहे.
नवरात्रीच्या अखेरीस, ३० सप्टेंबर रोजी पूज्य श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या पौरोहित्यात श्री कालिका अगस्त्यीश्वर निकूम्मला महायज्ञ आयोजित केला आहे. हा महायज्ञ संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत होणार असून, भोजनप्रसादीचा लाभ रात्री ९ वाजल्यापासून सर्व भक्तांना मिळणार आहे.
या संपूर्ण भक्तिसोहळ्यात सहपरिवार सहभागी होऊन देवीचे आशीर्वाद लाभावेत, असे आयोजक प्रमोद माणिकचंदजी दुगड यांनी आवाहन केले आहे.
