सरकारी कामात अडथळा : संशयित आरोपींना पळून जाण्यास मदत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वादग्रस्त आणि भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून मनोरमा दिलीप खेडकर (वय ४८, रा. नॅशनल सोसायटी, बाणेर-पाषाण रोड) व त्यांच्या साथीदारांची नावे गुन्ह्यात नमूद आहेत.
रबाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक खरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी नवी मुंबईत भरधाव ट्रक मोटारीला धडकला. या वादातून ट्रकचा क्लिनर प्रल्हाद कुमार (वय २२, रा. नवी मुंबई) याला मोटारचालकाने कारमध्ये बसवून “पोलीस ठाण्यात चला” असे सांगितले. मात्र, तो कारसह पसार झाला.
या घटनेची तक्रार ट्रकमालकाने रबाळे पोलीस ठाण्यात दिली. कारचे लोकेशन काढल्यावर ती पुण्यात आढळून आली. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास रबाळे पोलिसांचे पथक खेडकर यांच्या बंगल्यावर तपासासाठी गेले.
तेव्हा मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना भेटून घेतले, पण चौकशीसाठी सहकार्य करण्याऐवजी बंगल्याचा दरवाजा बंद केला. यामुळे आरोपीला पसार होण्यास मदत झाली. पोलिसांनी असा आरोप केला आहे की, त्यांनी पोलिसांना थांबवण्यासाठी बंगल्यातील पाळीव श्वान सोडले, ज्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. दरम्यान आरोपी कारसह पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, अपर पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मनोरमा खेडकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, अपहरण करण्यात आलेल्या ट्रक क्लिनरची रबाळे पोलिसांनी सुरक्षित सुटका केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.
पूर्वीचे वादग्रस्त प्रकार
– पूजा खेडकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
– मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा प्रकार घडला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.















