८१ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सेनापती बापट रोडवर राहणाऱ्या ५३ वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनिल कुमार, लक्ष्मणन बालासुभ्रमण्यम, सेल्वाकुमार सच्छिंदानंद नथ्थम, कुट्टी शंकरन, दिलीप कुमार वेणुगोपाल नायर, जॉन पीटर, के. जनागन सुधाकर आणि मायकल जॅक्शन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मॉडेल कॉलनीतील अमित अपार्टमेंट येथे १६ जानेवारी २०२४ रोजी घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची आरोपींशी ओळख झाली होती.
बांधकाम व्यवसायासाठी माफक दरात ग्रँडी अॅडलर पेट्रो केमिकल प्रा. लि. या खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला दाखविले होते.
त्यानंतर कर्ज मंजुरी प्रक्रिया तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली आरोपींनी वेळोवेळी एक कोटी ७८ लाख ९५ हजार रुपये घेतले. कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही.
कर्ज मंजूर केल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी बनावट डी.डी.चा वापर करून फिर्यादीचा विश्वासघात केला आणि आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.
