जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदरकुमार छाजेड यांची माहिती
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जीतो अॅपेक्सच्या वतीने ‘जीतो ग्रीन मिशन’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
जीतो अॅपेक्सच्या जीतो एन्वायरन्मेंट अॅण्ड सस्टेनिबिलीटी विभागातर्फे हे अभियान राबवले जाणार असून या अभियानांतर्गत जीतो पुणे च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक पेड़ माँ के नाम’ आणि ‘पर्यावरण की रक्षा – हमारी ज़िम्मेदारी’ अंतर्गत हे अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती जीतो अॅपेक्सचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी व जीतो पुणेचे अध्यक्ष इंदरकुमार छाजेड यांनी दिली. याप्रसंगी मुख्य सचिव दिनेश ओसवाल उपस्थित होते.
जीतो पुणे च्या वतीने उद्या, बुधवारी १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्यात येणार असून हा कार्यक्रम भिमाले उद्यान , सॅलिसबरी पार्क येथे दुपारी होणार आहे.
जीतो अॅपेक्सच्या वतीने आयोजित केलेल्या नवकार मंत्र महोत्सवावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र निर्माणासाठी संपूर्ण जैन समुदायाला ९ संकल्प करण्याचे आवाहन केले होते.
त्या ९ संकल्पांपैकी पर्यावरणाचे रक्षण हा एक संकल्प होता. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हे वृक्षारोपण जीतो पुणे वतीने केले जाणार आहे. हे वृक्षारोपणाचे अभियान महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
अहिंसा, सेवा आणि प्रकृतीचे संरक्षण या जैन धर्माच्या शिकवणीप्रमाणेच हे वृक्षारोपणाचे अभियान होणार असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जीतो एन्वायरन्मेंट अॅण्ड सस्टेनिबिलीटी विभागाचे चेअरमन आनंद चोरडिया व प्रकल्प अधिकारी सुजीत भटेवरा मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधानांना ९ लाख वृक्षारोपणाने शुभेच्छा!
जीतो अॅपेक्सच्या वतीने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या नवकार मंत्र महोत्सवावेळी उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हा सर्वांना संबोधित केले होते. जैन समाजाचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राष्ट्र उभारणीसाठी जैन समाजाने ९ संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यापैकीच पर्यावरणाचे संरक्षण हा एक संकल्प आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर ९ लाख वृक्षारोपण करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही खास भेट देत आहोत. या अभियानांतर्गत जीतो पुणे चॅप्टरनेही वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अधिकाधिक सदस्यांनी यासाठी उपस्थित राहावे. – विजय भंडारी (राष्ट्रीय अध्यक्ष, जीतो अॅपेक्स)
