महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ७५० मोफत डायलेसिस सेवा देण्याचा उपक्रम पुण्यात सुरू झाला आहे. राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वडगावशेरी येथील कोठारी चॅरिटेबल डायलेसिस सेंटरमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी डायलेसिस रुग्णांना मोफत उपचारासह फळांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण आठवडाभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोदी वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी डायलेसिस रुग्णांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले आणि सेंटरच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. सेंटरच्या दीपाली कोठारी यांनी पुणेरी पगडी परिधान करून खासदार कुलकर्णी यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला श्री गुरु गौतम ट्रस्टचे सतीश बनवट, शैलेश संचेती, अमित सातपुते, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे, वडगावशेरी संघाचे अध्यक्ष राजमल छोरिया, शांतिलाल बोरा, चंद्रकांत पगारीया, गौतम बुरड, संतोष ललवाणी, नितीन संकलेचा, प्रकाश चोरडीया, तुषार बोगावत, महावीर ब्रम्हेचा, हर्षल दुगड, किशोर छोरिया, आशीष बोरा, अजित छाजेड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार कोठारी चॅरिटेबल डायलेसिस सेंटरचे प्रफुल्ल कोठारी यांनी मानले. या उपक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.
