ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालिका, गेल्या दीड वर्षांपासून होती फरार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ठेवीदारांची तब्बल २ हजार ४७० कोटी रुपयांची फसवणूक करून दीड वर्षांपासून फरार असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीची संचालिका अर्चना सुरेश कुटे हिला सीआयडीने पुण्यातील बाणेर परिसरातून अटक केली. अर्चना कुटे ही सोसायटीचे चेअरमन व मुख्य आरोपी सुरेश कुटे यांची पत्नी आहे.
या प्रकरणात सीआयडीने आधीच सुरेश कुटेला अटक केली असून, सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, संचालक व अधिकाऱ्यांवर मे ते सप्टेंबर २०२५ दरम्यान एकूण ९५ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडे आहे.
सीआयडीच्या पथकाने अर्चना कुटेकडून अपहारित रकमेवरून खरेदी केलेला २ कोटी १० लाख ७५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ८० लाख ९० हजार ९५० रुपयांचे ६० नग सोने, ५६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचे २७० नग चांदी, ६३ लाखांची रोकड आणि १० लाखांची बीएमडब्ल्यू स्कुटी यांचा समावेश आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सुरेश आणि अर्चना कुटे यांनी ४ हजारांहून अधिक ठेवीदारांकडून तब्बल २ हजार ४७० कोटी रुपये जमा केले होते. या प्रकरणात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी)ने आधीच ३३३ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.
तसेच सीआयडी व आर्थिक गुन्हे शाखेने एमपीआयडी कायद्यानुसार २०७ मालमत्ता गोठवून त्याबाबतचे प्रस्ताव सादर केले आहेत. एकूण १३ संचालकांपैकी आतापर्यंत ९ संचालक आणि मुख्य आरोपी सुरेश कुटे यांची पत्नी अर्चना कुटे यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोघ गावकर, तसेच सीआयडी छत्रपती संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलीस निरीक्षक विजय पणदे, पोलीस हवालदार कारभारी गाडेकर, देवचंद घुणावत व सहायक फौजदार सय्यद रफिक यांनी केली.
