सोपानबाग येथील मिळकतीवर बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलणाऱ्या भंगार विक्रेत्यावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील आलिशान सोपानबाग परिसरातील मिळकतीची बनावट कागदपत्रे सादर करून एका भंगार विक्रेत्याने आयसीआयसीआय बँकेकडून तब्बल ५ कोटी रुपयांचे कर्ज उचलले. मृत्युपत्राचा दस्त लिज डिड म्हणून दाखवून कर्ज मंजूर करून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड अर्जुन अथोली (वय ३९, रा. साळुंखे विहार) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे फिर्याद दिली. त्यावरून महमद युनुस शरीफ शेख व दरिऊस सोलमन रफत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमद युनुस शरीफ शेख हा देहूरोड येथे भंगार व्यवसाय करतो, असे सांगून त्याने तीन वर्षांचे आयटी रिटर्न बँकेला सादर केले. दरम्यान, दरिऊस सोलमन रफत यांच्या नावावर असलेली सोपानबाग को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील मालमत्ता खरेदी करण्यासाठी ६ कोटी रुपयांच्या कर्जाची फाईल सादर करण्यात आली.
बँकेच्या क्रेडिट युनिट, रिस्क टीम, टेक्निकल व्हॅल्युएशन टीम, लिगल टीम व ऑपरेशन्स टीम या सर्व विभागांनी कागदपत्रांची पडताळणी करून फाईल मंजूर केली. त्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या रविवार पेठ शाखेतून १४ जुलै २०२३ रोजी महमद युनुस शेख यांना ५ कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजूर करण्यात आले. त्याचा मासिक हप्ता ४ लाख ३२ हजार २९० रुपये निश्चित करण्यात आला.
यानंतर २९ ऑक्टोबर २०२३ रोजी महमद युनुस शेख व दरिऊस रफत यांच्यात अॅग्रीमेंट टू सेल झाले आणि ३० ऑक्टोबर २०२३ रोजी असाइनमेंट डिड (सेल डिड) करण्यात आले. हे दोन्ही दस्त बँकेत जमा झाल्यानंतर ३ नोव्हेंबर २०२३ रोजी ५ कोटी रुपयांचा चेक दरिऊस रफत यांच्या बंधन बँक खात्यात जमा झाला.
कर्जदाराने सुरुवातीचे दोन हप्ते वेळेवर भरले, परंतु त्यानंतर हप्ते थकू लागले. मार्च २०२४ पासून कोणताही ईएमआय न भरल्याने वसुली पथकाने चौकशी केली असता सदर मालमत्ता ही दरिऊस रफत किंवा महमद शेख यांची नसून प्रेम फत्तेचंद वजरानी यांची असल्याचे उघड झाले.
तपासात समोर आले की, कर्जासाठी सादर केलेला दस्त हा लिज डिड नसून मृत्युपत्राचा दस्त होता. हा दस्त नोंदणी विभागाच्या (IGR) अधिकृत संकेतस्थळावर लिज डिड म्हणून उपलब्ध नव्हता. अशा प्रकारे बनावट दस्त तयार करून तो बँकेत सादर करण्यात आला व त्यावरून ५ कोटी २७ लाख ६९ हजार १९२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्र्वेता बेल्हेकर करीत आहेत.
