दमदार खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला : जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : भूम तालुक्यातील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेत यजमान शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यात संघाने प्रभावी बचाव आणि चढायांचा अचूक वापर करून प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने पराभूत केले. खेळाडूंच्या जिद्दीने, शिस्तबद्ध खेळाने व संघभावनेच्या बळावर विजेतेपद मिळवले.
विजयी संघातील खेळाडूंना पुढील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या विजयामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “संघ पुढील स्पर्धेतही नक्कीच चमकदार कामगिरी करेल” असा विश्वास व्यक्त केला.
तसेच पर्यवेक्षक राम सोळंके, प्रा. तानाजी बोराडे, प्रा. अनुराधा जगदाळे, क्रीडा शिक्षक महेश सुर्यवंशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या यशामुळे शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव वाढला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्तम यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
