मांजरा नदीत उतरून ग्रामस्थांचा इशारा : निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
धाराशिव : वाशी तालुक्यातील जनकापूर येथे अतिवृष्टीमुळे पारगाव–जनकापूर दरम्यानचा रस्ता मांजरा नदीच्या पुराने वाहून गेला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी जलसमाधी उपोषण सुरू केले आहे. सकाळपासून गावकरी मांजरा नदीत उतरून पाण्यात बसले आहेत. प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. “जोपर्यंत रस्ता प्रश्न सोडवला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील” असा ठाम निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. गावकऱ्यांच्या या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनावर दडपण आले असून, रस्ता प्रश्न निकाली काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
