महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजे सोमवारी घटस्थापनेपासून यावर्षीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. या नवरात्र उत्सवानिमित्त माँ आशापुरा माता मंदिरात तयारीला वेग आला आहे. यंदाचा उत्सव दहा दिवसांचा असणार असून यामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली.
यावर्षीच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात सोमवारी सकाळी १०.३० वाजता घटस्थापनेने होईल. शंभर महिलांचा सहभाग असलेल्या विशेष ढोल पथकाच्या गजरात घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे.
या नवरात्र उत्सवामध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्रीसूक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्रीदेवी सूक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होईल, तर सकाळी ७ ते ९ या वेळेत अभिषेक होणार आहे. नवचंडी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत पार पडेल. सायंकाळी ७ वाजता महाआरती होईल, त्यानंतर देवीचे भजन आणि देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम ‘माता की चौकी’ होईल.
यावर्षी ‘आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन’च्या वतीने शनिवारी २७ सप्टेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत चालणार आहे. याबरोबरच बुधवारी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता युवकांचा सहभाग असलेला नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब होणार आहे.
माँ आशापुरा ही राजस्थानमधील अनेकांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात आशापुरा मातेचे मंदिर नसल्याने पुणे आणि परिसराबरोबरच महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु मूळच्या राजस्थानमधील लोकांना लग्नकार्य अथवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानमध्ये जावे लागत असे.
नागरिकांना इथेच आशापुरा मातेचे दर्शन घेता यावे, या हेतूने विजय भंडारी आणि त्यांच्या परिवाराने गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा मातेचे भव्य मंदिर बांधले. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरूपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.
माँ आशापुरा नवरात्र उत्सवातील महत्वाचे कार्यक्रम
सोमवार, २२ सप्टेंबर – शंभर महिलांच्या विशेष ढोल पथकाच्या गजरात घटस्थापना – सकाळी १०.३०
शुक्रवार, २६ सप्टेंबर – श्रीसूक्त पठण – सकाळी ७
शुक्रवार, २६ सप्टेंबर – महिला सशक्तीकरण चर्चासत्र – सायं. ७.३०
शनिवार, २७ सप्टेंबर – श्रीदेवी सूक्त पठण – दुपारी २
शनिवार, २७ सप्टेंबर – मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी – सकाळी १० ते दुपारी ४
सोमवार, २९ सप्टेंबर – नवदुर्गा सन्मान पुरस्कार समारंभ – सायं. ७.३०
बुधवार, १ ऑक्टोबर – नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब – सायं. ७.३०
देवीच्या रुपातील माता-भगिनींचा सन्मान!
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या देवींचा जागर व्हावा, त्यांची पूजा व्हावी म्हणून घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात देवीची मनोभावे पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान करण्याची परंपरा माँ आशापुरा माता मंदिरात आहे. माता-भगिनींचा सन्मान करण्यामुळे साक्षात देवीमातेचाच सन्मान झाल्यासारखे वाटते. या कारणास्तव माता-भगिनींच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी माँ आशापुरा माता मंदिरात होणाऱ्या नवरात्र उत्सवात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला जातो. महिलांचे सबलीकरण व्हावे म्हणून काय करता येईल, या अनुषंगाने महिलांसंबंधीच्या विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन देखील केले जाते. यावर्षी होणाऱ्या नवरात्र उत्सवात देखील हे सर्व उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आशापुरा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण अवश्य यावे. – विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)
