महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या आदेशान्वये अकलुज येथे सराईत 13 गुन्हेगारांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. मौजे अकलुज, तालुका माळशिरस येथील लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी गुन्हे दाखल आहेत.
या टोळीने माळशिरस तालुक्यात संघटीतपणे गुन्हे करून समाजात दहशत पसरवली आहे. टोळीच्या सदस्यांनी मागील 10 वर्षांमध्ये घातक शस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, मालमत्ता जबरीने घेण्याचा प्रयत्न करणे, गैरकायदेशीर मंडळी जमवून दंगा करणे, धमकी देणे यासह गंभीर गुन्हे केले आहेत.
या टोळीतील सदस्यांविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, तरीही सुधारणा दिसली नाही. दि. 14/06/2025 रोजी टोळीने संयुक्तरित्या खुनाचा प्रयत्न करण्याचा गंभीर गुन्हा केला होता. या प्रकरणी अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक 440/2025 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
अकलुज पोलीस ठाण्याकडून याप्रकरणी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 23(1)(अ) अंतर्गत मोक्का कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी शिफारशीसहित पाठवला.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सदर टोळीतील आरोपींना मोक्का कलम लावण्याची मंजुरी दिली असून पुढील तपास संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज यांचेकडे देण्यात आला आहे.
सदर कारवाईमध्ये मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मण बाबाजी बंदपट्टे, बाजीराव हणंमत सरगर, शंकर अशोक काळे, एनेश्वर उर्फ माऊली अशोक काळे, राजु ज्ञानेश्वर काळे, अर्जुन दत्ता चौगुले, अतुल दत्तात्रय काळे, आकाश रमेश धोत्रे, बाळु भारत मदने, रोहित मारुती काळे, सलीम अब्दुल तांबोळी, मनोज अशोक काळे आणि किशोर राजेंद्र नवगन यांचा समावेश आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अकलुज; पो.नि. संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा; पो.नि. निरज उबाळे, अकलुज पोलीस ठाणे; सपोनि योगेश लंगोटे; पोउपनि सुधीर खारगे; पोह अमोल बकाल; समीर पठाण; रियाज तांबोळी आणि हरीष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुज पोलीस ठाण्याकडून प्रभावीपणे केली गेली आहे.
