न्यायालयाकडून दोघांना १५ दिवसांच्या कैदेसह दंडाची शिक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मद्य पिऊन वाहन चालविणे दोघा वाहनचालकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. न्यायालयाने दोघांना १५ दिवसांची साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
खडकी भागात मद्य पिऊन वाहन चालविणारा रोहित शैलेंद्र वर्मा (वय २९, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यांन्वये खटला दाखल करण्यात आला होता. सोमवारी (२२ सप्टेंबर) शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी वर्मा यांना दोषी ठरवून १५ दिवसांची साधी कैद आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
नांदेड सिटी वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालक राजकुमार मंगिणी कुलाळ (वय ३१, रा. मंगल भैरव सोसायटी, नांदेड सिटी) याच्याविरुद्ध खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी झाली.
न्यायालयाने कुलाळ यांना १५ दिवसांची साधी कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
वाहतूक पोलिसांकडून सरकारी वकील म्हणून वसार्राणी जाधव यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी खटल्याचे काम पाहिले.
नऊ महिन्यांत चार हजार मद्यपींवर कारवाई –
वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. मद्यपी वाहनचालकांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. २२ सप्टेंबरपर्यंत वाहतूक पोलिसांनी तीन हजार ९४८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून खटले दाखल केले आहेत.
ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह केसेस –
२०२० – १७
२०२१ – ६९
२०२२ – ३७
२०२३ – ५६२
२०२४ – ५२९३
२०२५ (सप्टेंबरपर्यंत)- ३९४८
