विमानतळावर घेऊन आल्या विनापरवाना पिस्टल व २ जिवंत काडतुसे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विनापरवाना पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन विमानतळावर आलेल्या एका महिलेवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वैशाली वैभव दोशी (वय ४४, रा. अदित्य कॉम्प्लेक्स, हरिकृपानगर, इंदापूर रोड, बारामती) असे महिलेचे नाव आहे. त्या पुणेहून इंदौर मार्गे दिल्लीला जाणार होत्या. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास लोहगाव विमानतळावरील लेव्हल २-ए मशीनवर त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान संशयास्पद मेटल आढळल्याने सिक्युरिटी स्क्रिनर जयेंद्र शिरोडकर (वय ३३, रा. टिंगरेनगर) यांनी सहकार्यांना माहिती दिली. लेव्हल ३ वरील सिक्युरिटी स्क्रिनर संदेश वंजारी व टीमने बॅग उघडून तपासणी केली असता काळ्या रंगाच्या केसिंगमध्ये एक पिस्टल आणि मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
याबाबत विचारणा केली असता वैशाली दोशी यांच्याकडे पिस्टलचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोशी या तंत्रविद्या शिकविण्याचा व्यवसाय करतात. पिस्टल त्यांना त्यांच्या एका शिष्याने दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. विनापरवाना गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक गुंड याप्रकरणी तपास करत आहेत.















