कदमवाकवस्तीतील घटना : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे ग्रामीण परिसरात एम.एस.ई.बी.चा डी.पी. फोडून त्यामधून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या दोन जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 101 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा जप्त केल्या असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत करण्यात आली.
अमित उर्फ काल्या बजरंग चव्हाण (वय 23, सध्या रा. शिवाजीनगर वस्ती, खेड शिवापुर, ता. हवेली, मूळ रा. इंदिरानगर, कुडाळ ता. जावली जि. सातारा), सागर विलास पवार (वय 23, रा. आबा कोंडे यांची चाळ, खेड शिवापूर, मूळ रा. कुडाळ, ता. जावली जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमएसईबीचे डी.पी. फोडून त्यामधील तांब्याची तार चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना दोन जण कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत तांब्याच्या तार विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, संभाजी देविकर, निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, बाजीराव वीर, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
