गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडून गुन्हा दाखल : बेकायदा जादा पैशांची मागणी
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या आणि बेकायदा जादा पैशांची मागणी करणाऱ्या सावकारावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडून कारवाई करण्यात आली असून तसा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आंबेगावच्या एका 48 वर्षीय फिर्यादीकडून मार्च २०१८ मध्ये सावकार कैलास उर्फ आप्पा बाबुराव बिबवे (रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) याच्याकडून २५,००० रुपये मागितले असता सावकार कैलास बिबवे याने फिर्यादीस दहा टक्के व्याजाचे २,५०० रुपये अगोदरच कपात करून फिर्यादीस रोख रुपये २२,५०० दिले होते. त्या मोबदल्यात फिर्यादीने सावकार बिबवे यास ५३ हजार रुपये परत केले असतानादेखील सावकार कैलास बिबवे हा फिर्यादीकडे आणखीन ५५ हजार रुपयांची मागणी करत होता. याबाबत फिर्यादीने खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा येथे तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जावर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त झालेले होते.
सदर अर्जावरून फिर्यादी यांनी सावकार नामे सावकार कैलास बाबुराव बिबवे याचे विरुध्द फिर्याद दिल्याने सावकार इसमावर बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, बालाजी पांढरे, पोलीस उप-निरीक्षक, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत औचरे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, विजय गुरव, राहुल उत्तरकर, प्रवीण पडवळ, संग्राम शिनगारे, अमोल पिलाणे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराव, चेतन शिरोळकर, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रूपाली कर्णवर यांनी केलेली आहे.
