कोथरुड गोळीबार प्रकरण : बंडु आंदेकर टोळीनंतर घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : साईड दिली नाही म्हणून तरुणावर गोळीबार करणे तसेच पूर्ववैमनस्यातून आणखी एका तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या घायवळ टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.
रस्त्यात थांबलेल्या तरुणांनी साईड न दिल्याने घायवळ टोळीतील गुंडांनी प्रकाश धुमाळ (वय ३६, रा. गणेशनगर, थेरगाव) याच्यावर १७ सप्टेंबर रोजी गोळीबार करून जखमी केले होते. त्यानंतर काही अंतरावरील सागर कॉलनीमध्ये वैभव तुकाराम साठे (वय १९, रा. सागर कॉलनी, कोथरुड) याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले होते.
या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ माजली होती. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणात दोन खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करून रात्रीतून ६ जणांना अटक केली होती. त्यात मयूर गुलाब कुंबरे (वय ३०, रा. सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड), गणेश सतीश राऊत (वय २६, रा. नवएकता कॉलनी, हमराज मित्र मंडळासमोर, कोथरुड), मयंक विजय व्यास, दिनेश राम फाटक, आनंद अनिल चांदळेकर (सर्व रा. कोथरुड) यांचा समावेश होता.
या आरोपींकडे कसून चौकशी केल्यावर त्यात निलेश घायवळ याचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना निलेश घायवळ याने पिस्टल दिल्याचे समोर आले. ‘आपली दहशत कमी होत चालली आहे, धाक निर्माण करा’ अशी चिथावणी निलेश घायवळकडून दिल्याचे उघड झाले.
यानंतर पोलिसांनी निलेश घायवळ, अक्षय गोगावले, मुसा शेख, जयेश वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केला.अखेर पोलिसांनी या प्रकरणात निलेश घायवळसह १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
