सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी मुद्देमालासह रिंग रोडवर पकडला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. अवघ्या तीन तासांत ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास व सुरक्षिततेची भावना दृढ झाली असून, गुन्हेगारांत खळबळ उडाली आहे.
२६ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विलास दत्तात्रय सुरवसे हे भगवंत मंदिरात असताना त्यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उघड्या दारातून प्रवेश केला. घरातील तिजोरी फोडून ३ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा नोंदताच पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने कामाला लावले. पथकाने अथक परिश्रम घेत शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे अवघ्या तीन तासांत आरोपी नागेश राजू बगाडे (वय ३२, रा. झाडबुके मैदानामागे, पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी) याला चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह रिंग रोड, बार्शी येथून ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ अमोल माने, बाळासाहेब डबडे, प्रवीण साठे, पोकॉ धनराज फत्तेपुरे, अंकुश जाधव, अविनाश पवार, राहुल उदार, सचिन देशमुख, सचिन नितनात, इसामिया बहिरे, अजीज शेख, सतीश उघडे व वैभव भांगे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पथकाचे अभिनंदन करताना सांगितले, “अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पोलिस पथकाच्या समर्पित प्रयत्नांमुळे आम्ही गुन्हेगारांना त्वरित पकडण्यात यशस्वी ठरलो.
यामुळे बार्शी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा विश्वास दृढ झाला आहे.” घरातून बाहेर पडताना दारे-खिडक्या सुरक्षित ठेवाव्यात. संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.















