स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी : सचिव कार्यालयात गुंडागर्दीचा प्रकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे बाजार समितीमध्ये झालेल्या गोंधळानंतर सभापती, सचिव आणि काही सदस्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. शिवीगाळ, धक्काबुक्की, जिवे मारण्याच्या धमक्या आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न अशा गंभीर प्रकारामुळे वातावरण तापले आहे.
पत्रकार सुहास बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी वृत्तांकनासाठी सचिवांच्या केबिनमध्ये गेले असता संचालक अनिरुद्ध भोसले यांनी आणलेल्या सुमारे २० ते २५ गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना धमकावले. “मी पत्रकार म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना माझा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली,” असे बनसोडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी सभापती प्रकाश जगताप, सचिव डॉ. राजाराम धोंडकर आणि अन्य व्यक्तींविरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेनंतर बाजार समितीच्या वतीनेही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सचिव व सभापती यांनी लवांडे, बनसोडे आणि सुर्यकांत काळभोर यांच्यावर सचिव कार्यालयात अरेरावीची भाषा वापरून कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे.
समितीच्या तक्रारीत म्हटले आहे की, “संचालक संतोष नांगरे, अनिरुद्ध भोसले, गणेश घुले तसेच सभापती जगताप यांना धमक्या देत दमदाटी करण्यात आली.” दरम्यान, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत काळभोर यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी म्हटले, “गुरुवारी समितीत गेलो असता सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप व काही संचालकांनी मला आणि माझ्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. माझ्या किंवा कुटुंबाच्या जीवाला काहीही झाले तर सभापती जबाबदार असतील.”
काळभोर यांनी सभापतीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. या तिन्ही तक्रारींमुळे बाजार समितीतील वाद अधिकच चिघळला असून पोलीस तपास सुरू आहे.















