ॲम्बुलन्स न आल्याने रिक्षेतून रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : माढा तालुक्यातील चांदज गावचे सावळाराम मोहिते (वय ७०) हे भगवंताच्या दर्शनासाठी बार्शीला आले होते. सायंकाळच्या आरतीपूर्वीच ते मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्या जवळ आणलेला डब्बा खात होते. जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी बाहेर पडताच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जोराने खाली कोसळले.
जोराचा आवाज झाल्याने तिथे उपस्थित असलेले बार्शीतील युवक मंजुनाथ नागशेट्टी, सिद्धेश्वर शिवशंकर कापसे, अजय अरगडे, ऋषीकेश पवार, अमोल ठोंगे, माऊली जगताप आणि सुमित मिसाळ यांनी तात्काळ धाव घेतली.
त्यांनी मोहिते यांना उचलून तोंडावर पाणी शिंपडले, मात्र ते शुद्धीवर आले नाहीत. युवकांनी ॲम्बुलन्ससाठी वारंवार फोन केले; मात्र ॲम्बुलन्स वेळेत आली नाही. त्यामुळे या तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ रिक्षा थांबवली आणि मोहिते यांना जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल केले.
उपचारासाठी डॉक्टरांनी तातडीने सिटीस्कॅन, रक्त तपासणी आणि औषधोपचार सुरू केले. सुरुवातीला तातडीचा स्व:खर्चे अजय आरगडे, सिध्देश्वर कापसे व मंजुनाथ नागशेट्टी यांनी केला. दरम्यान, मोहिते यांच्या खिशात सापडलेल्या डायरीतील क्रमांकांवर युवकांनी फोन केला.
त्यातून त्यांचा पुतण्याशी संपर्क झाला आणि त्याने मुलगा शशिकांत मोहिते यांच्याशी संपर्क साधून दिला. शशिकांत हॉस्पिटलमध्ये आल्या नंतर त्यांचा वडिलांच्या उपचारात युवकांनी दाखवलेली जबाबदारी व केलेली मदत पाहून त्याने त्यांचे आभार व्यक्त मनःपूर्वक कौतुक केले.
सध्या मोहिते यांच्यावर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बार्शीतील या तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वयस्कर भक्ताचा जीव वाचला. त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक बांधिलकी, परोपकार आणि मानवतेचे खरे दर्शन घडले आहे.















