शेतकऱ्याच्या स्कॉर्पिओचा नंबर स्वतःच्या दुचाकीला वापरला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : परदेशात पळून गेलेल्या गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक उद्योग समोर आला आहे. त्याने इंदापूरमधील शेतकऱ्याच्या स्कॉर्पिओचा नंबर स्वतःच्या दुचाकीला वापरल्याचे आढळून आले आहे. कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सागर भाऊसाहेब बंडगर (वय ३७, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा नंबर जुन्या पद्धतीच्या नंबर प्लेटचा आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे महिंद्र कंपनीची स्कॉर्पिओ गाडी असून तिचा नंबर एमएच१२ एक्सडब्ल्यू ८९५५ असा आहे.
कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ याच्याकडील सुझुकी अॅक्सेस ही दुचाकी जप्त केली आहे. तिचा नंबरही एमएच१२ एक्सडब्ल्यू ८९५५ आहे. आरटीओकडे याबाबत पोलिसांनी तपासणी केली असता, हा नंबर स्कॉर्पिओचा असून ती फिर्यादी यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्यांना बोलावून घेतले. त्यांनी आपल्या गाडीची कागदपत्रे सादर करून हा नंबर आपल्या गाडीचा असून निलेश घायवळ याने आपल्या गाडीचा नंबर बदलून त्याच्या दुचाकीला वापरून माझी तसेच शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण करीत आहेत.
निलेश घायवळ स्वित्झर्लंडमध्ये – निलेश घायवळ हा सध्या परदेशात असल्याची माहिती मिळाली आहे. तो लंडन येथे असल्याचे सुरुवातीला समजले होते. मात्र पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तो सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट बनवून घेतल्याचेही निष्पन्न झाले आहे.















