लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने हेल्मेट व शिलाई मशिन भेट
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माँ आशापुरा माता मंदिरात सुरु असलेल्या नवरात्र उत्सवात लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने पुणे शहरातील वाहतूक पोलिसांन १२०० हेल्मेट भेट देण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत हे हेल्मेट भेट देण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, श्याम खंडेलवाल, गोपालकृष्णन अग्रवाल, जिनेंद्र लोढा, मनोज छाजेड, मंगेश कटारिया, सुनील खंडेलवाल, शैलेश खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
माँ आशापुरा माता मंदिरातील नवरात्र उत्सवात दरवर्षी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीदेखील अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये या महत्वपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे.
वर्षभर वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करीत असतात. ऊन, वारा, पाऊस आणि प्रदूषणामध्ये थांबून पोलीस काम करतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२०० हेल्मेट पुणे शहर वाहतूक पोलिसांना भेट म्हणून देण्यात आली आहेत.
याबरोबरच सेंट हिल्डास स्कूलच्या मुलींचे माँ आशापुरा माता मंदिरात कन्यापूजन करण्यात आले. या मुलींच्या मनोरंजनासाठी यावेळी मॅजिकल शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेला अन्नधान्य देण्यात आले.
गरजू महिलांना शिलाई मशीन्स भेट – याबरोबरच लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंडच्या वतीने गरजू महिलांना त्यांच्या जीवन चरितार्थ चालवण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून शिलाई मशीन भेट देण्यात आल्या. लायन भारती भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली लायन लेडीज ऑक्जिलरी बोर्डच्या संगीता अगरवाल, रंजना लोढा, शिल्पा कटारिया, रेखा खंडेलवाल, पूनम ओसवाल यांच्या उपस्थितीत या शिलाई मशीन भेट म्हणून देण्यात आल्या. समाजातील १० गरजू महिलांना या मशीन भेट दिल्या.
नवरात्र उत्सव म्हणजे सेवेचा उत्सव – नवरात्र उत्सव म्हणजे नऊ दिवस देवीच्या सेवेचा उत्सव. याकाळात देवीचा जागर होतो. आणि यानिमित्ताने माँ आशापुरा माता मंदिरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून सेवा केली जाते. महिला शक्तीचा यशस्वी नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला जातो. अनेक घटकांना मदत केली जाते. या अनुषंगानेच वर्षभर सेवा देणाऱ्या वाहतूक पोलिसांना हेल्मेट देऊन त्यांचा सन्मान करण्याचे काम केले आहे. कन्यापूजन करून देवीचे रुप असलेल्या कन्यारत्नांचे पूजन करण्याचे भाग्य आम्हाला मिळते. – विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट)
