नेत्रचिकित्सेत जागतिक दर्जा : बजाज फिनसर्व्हच्या CSR उपक्रमातून नवा टप्पा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : नेत्रचिकित्सा क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत पीबीएमएच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन नुकतेच पार पडले. अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करून देणारी ही इमारत रुग्णांसाठी मोठी सोय ठरणार आहे.
या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन बजाज फिनसर्व्हच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षा शेफाली बजाज यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पीबीएमएचे चेअरमन नितीन देसाई, अध्यक्ष डॉ. राजेश शहा, उपाध्यक्ष सुधीर साबळे व मनीष जैन, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे, वैद्यकीय संचालक डॉ. सुचेता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कामकाज अधिकारी डॉ. सुशीला कवडे भोसले यांनी केले. नूतनीकृत इमारतीमध्ये समुपदेशन कक्ष, सल्ला कक्ष, रिफ्रेशिंग युनिट, निदान सेवा, ओपीडी, ऑप्टिकल स्टोअर, फार्मसी आणि अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष अशी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
रुग्णांची सोय लक्षात घेऊन प्रतीक्षा कक्ष, डोमच्या आकाराची लॉबी, आधुनिक स्वागत कक्ष व रुग्णालयात ये-जा करण्यासाठी सुबक मार्गिका यांचाही समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमात बोलताना नितीन देसाई यांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा, विविध उपक्रम व भविष्यातील योजनांचा आढावा दिला.
डॉ. राहुल देशपांडे यांनी सेवा क्षमता वाढविण्याबाबत माहिती दिली तर डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी कौशल्य विकास व संशोधन उपक्रमांवर प्रकाश टाकला. कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया यांनी पुढील तीन वर्षांत पायाभूत सुविधा तिपटीने वाढवून शस्त्रक्रियांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
त्यांनी यासोबतच संशोधन व नव्या पिढीतील नेत्रतज्ज्ञ घडवण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम हे केंद्रस्थानी ठेवले जाणार असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांनी केले.
