नवरात्रोत्सवात सेवा देणाऱ्यांचा सन्मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : नवरात्रोत्सवामध्ये सलग दहा दिवस देवीची सेवा करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी मां आशापुरा माता मंदिर ट्रस्ट तर्फे बुधवारी विशेष कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मंदिरातील विविध धार्मिक व सामाजिक सेवेत योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मां आशापुरा माता मंदिरात प्राणप्रतिष्ठा, दैनंदिन अभिषेक, नवचंडी याग तसेच विविध पूजाविधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडतात. या धार्मिक विधींसाठी राजस्थानहून आलेले पं. जनार्दन ओझा व त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी मुक्कामी राहून अखंड सेवा दिली.
त्याचबरोबर मंदिरातील इतर कामकाजासाठी विविध स्वयंसेवकांनी पूर्णवेळ सेवा बजावली. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना श्रद्धा आणि भक्तीभावाने देवीचे दर्शन घेता आले. त्यांच्याच या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला.
या सोहळ्याला चेतन भंडारी, शाम खंडेलवाल, मंगेश कटारिया, गोपाल अग्रवाल, भारती भंडारी, लीना भंडारी, दिलीप मुनोत, रेखा खंडेलवाल, सुरेश दुसाद, राजेश सोनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंदिरातील सर्व कार्यकर्ते स्वतःहून काम पाहतात. आता येथील काम जणू ऑटो मोडवर चालते. प्रत्येक जण आपापले योगदान देत असल्याने हा उत्सव यशस्वीरीत्या साजरा होतो. माँ आशापुरा चे आशीर्वाद सर्वांना लाभावेत आणि सर्वांना या सेवेमुळे पुण्य मिळावे, हीच प्रार्थना आहे. – विजय भंडारी, अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट
योजकस्तत्र दुर्लभः असे म्हटले जाते. साधने उपलब्ध असली तरी त्यांची योग्य योजना करणारा अधिक महत्त्वाचा असतो. भंडारी परिवार, ट्रस्टचे सदस्य आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे माँ आशापुरा चा नवरात्र सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडतो. हे मंदिर आता एक शक्तीपीठ बनले आहे. – पं. जनार्दन ओझा















