मालवेअरची भीती दाखवून घालत होते गंडा : १६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३४ जणांवर गुन्हा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांना मालवेअरची भीती दाखवून त्यांच्याकडून अॅन्टीव्हायरस खरेदी करण्यास भाग पाडून फसवणूक करणार्या कॉल सेंटरवर गुन्हा शाखेच्या युनिट-५ पथकाने छापा टाकला.
हा कॉल सेंटर हडपसरमधील मगरपट्टा रोडवरील सिजन मॉलजवळील मार्वल फिगो बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर सुरू होता. या ठिकाणाहून १५ लाख ७६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल, ज्यात २९ लॅपटॉप, २० संगणक, ४१ मोबाइल, राऊटर व इतर साहित्य यांचा समावेश आहे, जप्त करण्यात आला.
या प्रकरणात कॉल सेंटरचे चालक निर्मल अजय शहा (३८, रा. कुमार पिकासो सोसायटी, हडपसर), अतुल प्रविणभाई श्रीमाळी (३०, रा. लेबरनम पार्क सोसायटी, हडपसर) तसेच युगंधर संजय हादगे (३४, रा. मांजरी) याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय २९ कामगारांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी दोघांचा शोध सुरु आहे.
कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी प्रामुख्याने गुजरात, आसाम, नागालँड, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब, मुंबई, ठाणे येथील असून त्यात एक नायजेरियाचा नागरिक देखील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधत होते. त्यांच्या मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणकात मालवेअर असल्याचे भासवून त्यांना घाबरवले जात होते. यानंतर त्यांच्या बँक खात्यांची, क्रेडिट कार्डची माहिती चोरीला जाण्याची भीती दाखवून विविध अॅन्टीव्हायरस व प्रोटेक्शन अॅप्स खरेदी करण्यास भाग पाडले जात होते. त्यासाठी पैसे थेट क्रिप्टो करन्सी (Binance Trust Wallet) द्वारे स्वीकारले जात होते.
फसवणुकीसाठी लागणारा डाटा हे आरोपी Senior Citizen Portal (Washington DC) आणि US Social Security Data मधून मिळवत असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहायक निरीक्षक अमोल रसाळ, छबू बेरड, उपनिरीक्षक प्रमोद खरात, संतोष तानवडे, अभिजित पवार यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.















