महापालिकेकडून दाखल तक्रारी : नाना पेठेत लावले होते बेकायदा फ्लेक्स
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नाना पेठेतील डोके तालीम परिसरात बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियाविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २३ सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात कारवाई करून बेकायदा फ्लेक्स काढून टाकले होते. या कारवाईनंतर महापालिकेच्या अधिकार्यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कृष्णा बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर आणि प्रियंका कृष्णा आंदेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नाना पेठेतील इनामदार चौकाजवळील खुर्शीद कॉम्प्लेक्सच्या समोर फुटपाथवर आंदेकर टोळीने बेकायदा फलक लावले होते. या कृत्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झाला असून शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे नमूद करून आंदेकर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय महापालिका अधिकाऱ्यांनी बेकायदा फ्लेक्स प्रकरणात आणखी एक फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात रफिक अहमद सैय्यद आणि इब्राहिम हशम शेख यांनी संबंधित फ्लेक्स लावला होता. त्यांनी ज्यांच्यासाठी हा फ्लेक्स लावला त्या बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर आणि शिवम आंदेकर यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आंदेकर टोळीच्या बेकायदा बांधकामांवर पोलिस आणि महापालिका प्रशासनाने २३ सप्टेंबर रोजी संयुक्त कारवाई केली होती. या कारवाईत पत्र्याचे शेड, तात्पुरती बांधकामे आणि गणेश पेठेतील नागझरी भागात सुरू असलेल्या बेकायदा मासळी बाजारातील फ्लेक्स व बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती. या कारवाईच्या अनुषंगाने हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
