सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर हॉटेलवर तरुणाला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फेसबुकवर झालेल्या ओळखीच्या माध्यमातून एका मिठाई विक्रेत्याकडून वेळोवेळी पैसे घेतले गेले. त्याला हॉटेलमध्ये आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करून त्या तरुणीने त्याच्याकडून २ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीचे पैसे मिळविण्यासाठी येणाऱ्या तरुणीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. परंतु, या चलाख तरुणीने दुकानात पैसे घेण्यासाठी येण्यास नकार देऊन पोलिसांना फसवले.
यानंतर फरासखाना पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४५ वर्षीय मिठाई विक्रेत्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादींचे लक्ष्मी रोडवर मिठाईचे दुकान आहे.
फेसबुकवर त्यांची स्नेहा मोहित कदम (वय ३०, रा. सांगली) या तरुणीसोबत ओळख झाली. ओळखीनंतर, २४ सप्टेंबर रोजी तिने ४ हजार रुपये मागितले. त्यावर त्यांनी गुगल पेवर ४ हजार रुपये पाठविले.
त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी तिने फोन करून कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेलवर बोलावले. रात्री साडेबारा वाजता ते हॉटेलबाहेर भेटले. हिंजवडीला बहिणीकडे जाण्यापेक्षा हॉटेलमध्ये राहण्याचे ठरवून त्यांनी हॉटेलचे बुकींग केले.
तिने फिर्यादीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यास नकार देऊन घरी निघून आले. त्याच दिवशी दुपारी, ते दुकानात असताना, ती अचानक दुकानात आली. हॉटेलमध्ये झालेल्या घटनेची भिती दाखवून दुकानात तमाशा करेल असे धमकावले. प्रकरण मिटविण्यासाठी त्यांना तिला ७० हजार रुपये दिले.
त्यानंतर तिने दुकानातील गल्ल्यातील पैसे व मिठाईचे बॉक्स जबरदस्तीने घेतले. ३ ऑक्टोंबर रोजी तिने हे प्रकरण मिटवायचे असल्यास २ लाख रुपये दे, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सापळा कारवाईसाठी तयारी करून मिठाईच्या दुकानात शुक्रवारी सापळा रचला, परंतु ही तरुणी चलाख निघाली.
फिर्यादी यांनी तिला पैसे देण्यासाठी दुकानात बोलावले असता, तिने येण्यास नकार दिला आणि निघून गेली. नंतर पुन्हा फोन करून गुगल पेवर पैसे देण्यास सांगितले. फरासखाना पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शितल जाधव तपास करीत आहेत.
