महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि सजग नागरिक यांच्या पुढाकारातून आणि संकल्पनेतून दक्षिण पुणे विचारमंच या सकारात्मक विचारांच्या नव्या कट्ट्याची सुरुवात झाली.
या पहिल्या संवाद कट्ट्यावर महापालिकेचे सहायक आयुक्त राजेश कादबाने यांनी उपस्थित राहून सर्वांसोबत मनमोकळ्या गप्पा आणि महत्वपूर्ण संवाद साधला. समाजातील विविध प्रश्न, विकासाच्या गरजा आणि सकारात्मक उपाययोजना यांवर झालेला हा संवाद प्रेरणादायी ठरला.
या वेळी कादबाने यांनी मार्गदर्शन करत हा कट्टा सकारात्मक विचारांची व्यापक चळवळ बनेल, असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमाला परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघांचे सदस्य तसेच सजग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी थेट किंवा अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
